रत्नागिरी:- कोविडच्या रुग्णांना उपचार करताना वादळाचे संकट उभे राहिले. अशावेळी व्हेंटिलेटरवर आणि आयसीयुमध्ये असलेल्या रुग्णांसाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. रुग्णांचे आणि हॉस्पिटलचे व्यवस्थापन हे मोठे आव्हान होते. सर्वात मोठा प्रश्न होता विजेचा. अशा प्रसंगात विविध खाती एकत्र आली आणि नियोजन केले. वादळाच्या अठरा तासात व्हेंटिलेटवरीलही रुग्णाचा श्वास एक क्षणही थांबू दिला नाही. वादळ परिस्थितीत प्रत्येक रुग्णाचा ऑक्सिजन चोवीस तास सुरू ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
या सार्या कामगिरीचे शिलेदार आहेत, जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, महावितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग. तौत्केला तोंड देत जिल्ह्यातील 39 कोरोना सेंटरना विनाखंड विद्युत पुरवठा देणे शिवधनुष्य होते. व्हेंटिलेटरवरील आणि आयसीयुमधील बाधितांना प्राणवायू महत्त्वाचा. वादळाची पूर्वकल्पना मिळाल्याने 3 ऑक्सिजन प्लॅन्टसह सर्व कोविड सेंटरसाठी पर्यायी व्यवस्था करून रुग्णांना प्राणवायू देण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन गोंधळ उडाला नाही.
वादळाची पूर्वसूचना दिल्यानतंर यंत्रणा कामाला लागली. मुख्य प्रश्न होता तो जिल्ह्यातील 39 कोविड सेंटरवर उपचार घेणारे सुमारे साडेतीनशे बाधित रुग्णांचा. व्हेंटिलेटरवरील आणि आयसीयुमधील रुग्णांना अखंडित प्राणवायू कसा देता येईल, यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, महावितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक झाली. बैठकीमध्ये प्रत्येक कोविड सेंटरला पर्यायी विद्युत पुरवठा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. त्यांना डिझेल देण्याची सूचना पेट्रोल पंपांना करण्यात आली. रविवारी दुपारी वादळाने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. संध्याकाळी वादळाने हाहाकार माजविला. जनरेटरमुळे जिल्ह्यातील 39 कोविड सेंटरवरील सुमारे 350 रुग्णांना विनाखंडित प्राणवायू देण्यात आला. तसेच 3 ऑक्सिजन प्लॅन्टलाही वीज पुवरठा करण्यात आला. जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, परकार हॉस्पिटल, अपेक्स हॉस्पिटल या कोविड सेंटरचा विद्युत पुरवठा सहा ते आठ तासांमध्ये पूर्ववत केला.









