रत्नागिरी:- शहरातील आलिमवाडीतील साडेतीन गुंठे जागेचा दर पालिकेने ठरविलेला नाही. नगर रचनाकार विभागाने रेडिरेकनर प्रमाणे केलेल्या मुल्यांकनाचा दर 1 कोटी 27 लाख रुपये आहे. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी यांची समितीमार्फत ते जागा मालकाला कळविण्यात येणार आहे. यात सत्ताधारी म्हणून आमचा काही संबंध नाही. पाणी योजना होणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. मात्र मिलिंद कीर यांनी चुकीच्या पद्धतीने नागरिकांना भडकावण्याचे काम करू नये, असा खुलासा नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी केला.
पालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष रोशन फाळके, नगरसेवक निमेश नायर आदी उपस्थित होते.
श्री. साळवी म्हणाले, मला या विषयाला प्रतिउत्तर द्यायचे नाही. परंतु नागरिकांमध्ये गैरसमज राहू नये, यासाठी मी या विषयाचा खुलासा करतोय. सुधारित पाणी योजनेसाठी आम्हाला शहराच्या खालच्या भागाला चांगले पाणी मिळावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून आम्ही उंची असलेल्या भागात साठवण टाकीसाठी जागा शोधत होतो. यापूर्वी खडप मोहल्ला जागेत सीआरझेड आणि दफनभुमी असल्याने तिथे बांधकाम होऊ शकत नाही. पंधरामाड येथील जागेलाही सीआरझेडचा अडसर आहे. त्यामुळे तेथे बांधकाम करता येत नाही. शासकीय जमीन देखील जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली. मात्र ती दलदलीची आहे. पाणी योजनेसाठी जागा आणि साठवण टाकी महत्त्वाची असल्याने आलिमवाडीतील मनिष नलावडे यांची जागा घेण्याचे निश्चित झाले. त्याने कितीला घेतली होती, याच्याशी आमचा काही संबंध नाही. मात्र 1 कोटी 53 लाख रुपये आम्हाला दर सांगितला. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्या समितीपुढे हा विषय गेल्यानंतर त्यांनी तो दर कमी करण्याचा निर्णय घेतला. नगररचनाकार विभागाने या साडे तीन गुंठे जागेचे मुल्यांकण केले. त्यामध्ये 1 कोटी 27 लाख रुपये दर त्यांनी निश्चित केला आहे. जिल्हाधिकार्यांच्या समितीपुढे हा विषय जाणार असून बंद लखोटा मालकाकडे जाईल. तो दर त्याला मान्य असले तर ठीक. मात्र त्याने त्यावर एक रुपया जरी मागितला तरी आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे हा दर ठरविण्यामध्ये पालिकेचा काही संबंध नाही. मिलिंद कीर चुकीची माहिती देऊन नागरिकांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकशाही असल्याने कीर यांनी कोणाकडेही तक्रार करायची कोणाकडे नाही, हा त्यांचा विषय आहे. नागरिकांमध्ये गैरसमज नको म्हणून मी हा खुलासा केला, असे साळवी यांनी स्पष्ट केले.