‘त्या’ शिक्षकाचे अनेक कारनामे समोर

महिला पालकांनाही पाठवत होता अश्लील मेसेज

रत्नागिरी:- विद्यार्थिनींना अश्लील मेसेजेस पाठवणार्‍या शहरातील नामवंत शाळेतील त्या ‘कलाकारी’ शिक्षकाचे अन्य कारनामेही आता हळहळू बाहेर येऊ लागले आहेत. हा शिक्षक शाळेतील विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवायचा शिवाय तो काही महिला पालकांनाही मेसेजेस पाठवत होता.

त्यापुढचा कहर म्हणजे त्याने अनेक महिला पालकांना तसेच इतर नागरिकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळलेले आहेत. नोकरी न मिळाल्याने त्यांनी त्या शिक्षकाचे घर गाठल्यावर त्याच्या आई-वडिलांनीच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तो अशाच प्रकारे फसवणूक करत असल्याचे सांगितले. हा शिक्षक नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून लाखो रुपये उकळण्याचे एक रॅकेटच चालवत असल्याची माहिती पुढे येत आहे.

यापूर्वी ‘हा’ शिक्षक शहरातील मध्यवर्ती असलेल्या या संस्थेच्या एका शाळेत अनेक वर्षे कार्यरत होता. या ठिकाणी तो विद्यार्थ्यांना भूगोल विषय शिकवत होता. मात्र, तो शिकवणी कमी आणि मोबाईलमध्ये अधिक कार्यान्वित असायचा. त्यामुळे मुले भूगोल विषयात नापासही झाली होती. या प्रकाराची दखल घेऊन सर्व पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रारदेखील केली होती. शाळेतील सर्व मुलांची त्यांच्या विरोधात नियमितपणे तक्रार असायची. मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता केवळ बदली करण्यात आली. आता याही शाळेततेच प्रकार सुरु असून हा पराक्रमी शिक्षक सध्या पोलिसांच्या रडारावर आहे. त्याचा शोध सुरु असून हा शिक्षक केवळ नावासाठी शिक्षक आणि इतर उद्योगच अधिक करत होता. मात्र, या शिक्षकावर कोणीही तक्रार दाखल केलेली नव्हती. या शिक्षकाचे असे अनेक प्रकार लवकरच उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.

शिक्षकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार देणार

दरम्यान, मंगळवारी पालकांनी या शिक्षकाविरोधात शाळेत धडक दिल्यानंतर शालेय व्यवस्थापनाने त्याच्यावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन पालकांना दिले. परंतू बुधवारी सायंकाळपर्यंत या शिक्षकाविरोधात शाळेने कारवाई न केल्यास पालक या शिक्षकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगितले.