तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्हा परिषद मालमत्तेचे दोन कोटींचे नुकसान 

रत्नागिरी:-  तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्हा परिषदेच्या मालमत्तेला फटका बसला आहे. 1 कोटी 95 लाख 84 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.

रविवारी (ता. 16) तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा जिल्ह्याला बसला. सलग दोन वेगवान वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. वार्‍यामुळे घराची छपरे, झाडे उन्मळून पडली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांसह आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. गतवर्षी निसर्ग चक्रीवादळातही 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यातील शाळांचे नुकसान 8 कोटीचे होते. सलग दुसर्‍या वर्षी झालेल्या वादळातही 1 कोटी 95 लाखाचा फटका बसला असून पंचनामे सुरु आहेत. यामध्ये रत्नागिरी व सिंधदुर्ग बांधकाम विभागातील 1 रस्ता व 1 साकव मिळून 44 लाखाचे नुकसान झाले. यामधील साकवाची संपूर्ण दुरुस्ती करावी लागणार आहे. 4 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे 35 लाख 15 हजार, महिला बालकल्याण विभागाच्या 27 इमारतींचे 6 लाख 69 हजार, आरोग्य विभागाच्या 15 इमारतींचे 12 लाख 35 हजार, उपकेंद्राच्या 3 इमारतींचे 23 हजार, यांत्रिकी विभागातील 1 इमारतीचे 48 हजार, 9 पशुधनाचे 2 लाख 7 हजार रुपयांचे, जिल्हा परिषद इमारतीवरील सौर पॅनलचे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाचे 1 हजार 405 हेक्टरचे आणि 5 घरकुलेही बाधित झाली आहेत. घरकुलांमध्ये पोफळी 1 आणि डेरवणमधील 4 इमारतींचा समावेश आहे.