पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर; नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता
रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात दोन दिवस थैमान घातले होते. त्याचा सर्वाधिक तडाखा सहा तालुक्यांना बसला. घरा, गोठ्यासह महावितरण, फळ बागायती आणि सार्वजनिक मालमत्तांचे मिळून सुमारे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्यांचे काम सुरु असून त्यासाठी आणखी दोन दिवस लागतील असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यातील किनारी भागांना दणका बसला. वादळ ओसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत. वादळात सुदैवाने जिवीतहानी झालेली नाही, मात्र 8 व्यक्ती जखमी झाल्या. 5 पशू मृत पावले असून 1 लाख 2 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले. 10 पूर्णतः घरांचे 59 लाख 78 हजार 800 रुपये, 1 हजार 863 अंशतः घरांचे 2 कोटी 41 लाख 55 हजार 268 रुपये, 130 गोठ्यांचे 9 लाख 13 हजार 300, सहा टपर्यांचे 3 लाख 56 हजार 200 रुपये, 106 शाळांचे 51 लाख, 48 शासकीय व सार्वजनिक इमारतींचे 41 लाख 19 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाकडील सुमारे साडेचार कोटी रुपयांचे नुकसान नोंदले असून यामध्ये पुढील दोन दिवसात आणखी वाढ होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील सहाशे घरांचे नुकसान झाले असून सर्व मिळून एक कोटीपर्यंत नुकसानीचा अंदाज आहे. विक्रमी मुसळधार पावसाची नोंद झालेल्या तालुक्यात वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे.
कृषी विभागाच्या नजर अंदाजे सर्व्हेक्षणात 2 हजार 500 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यात झाडे उन्मळून पडण्यासह फळ गळीचा समावेश आहे. निकषानुसार हेक्टरी 18 हजार प्रमाणे साडेचार कोटीचे नुकसान झाले. बाजारी दरानुसार हे नुकसान तिप्पटीवर जाऊ शकते. वादळात 1 हजार 239 गावातील 5 लाख 45 हजार वीज ग्राहकांना फटका बसला. वीजेचे खांब, वाहीन्यांसह फिडरचे मिळून सुमारे साडेपाच कोटीचे नुकसान झाले. बहूतांश कामे पूर्ण झाली असून मंगळवारी सायंकाळपर्यंत 71 हजार 861 ग्राहक अजुनही अंधारात आहेत.
घरांचे झालेले नुकसान
तालुका अशंतः घरे नुकसान (रुपये)
* मंडणगड 200 —
* दापोली 334 —
* खेड 46 4,34,520
* गुहागर 68 82,263
* चिपळूण 83 4,96,000
* संगमेश्वर 105 11,80,715
* रत्नागिरी 600 1,10,46,000
* लांजा 127 77,000
* राजापूर 404 1,01,00,000









