पाण्याला करंट; वादळाने व्यवसायावर पाणी फेरले
रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळ सरल्यानंतरही समुद्रातील पाण्याला अजुनही करंट असल्यामुळे हंगामच्या अखेरीस मच्छीमारांची निराशाच सुरु आहे. पावसाचे संकेत मिळाले की मासळी किनार्याकडे येऊ लागते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात थोडी फार मासळी जाळ्यात सापडते; मात्र यंदा वादळाने त्यावर पाणी फेरले आहे.
शासनाच्या निकषानुसार कोकण किनारपट्टीवरील मासेमारी 31 मे रोजी बंद होणार आहे. तत्पुर्वी मे महिन्यात 16 तारखेलाला तौक्ते चक्रीवादळ धडकले आणि मासेमारीवर संक्रात आली. वादळात हानी होऊ नये यासाठी मच्छीमारांना आधीच सुचना दिल्या होत्या. त्यानुसार चार दिवस मासेमारी पूर्णतः बंद होती. त्यानंतर काही मच्छीमारांनी अखेरच्या टप्प्यात मासा मिळेल या आशेने खोल समुद्र गाठला. त्यांच्या हाती अपेक्षित मासळीच सापडली नाही. वादळानंतर पुन्हा वातावरण बदलत राहील या शक्यतेने साठ टक्केहून अधिक मच्छीमारांनी नौका जेटीवर काढण्यास सुरवात केली होती. मिरकरवाडा बंदरातील दहा टक्केच मच्छीमार समुद्रात जात आहेत. त्यांना साधारण वीस किलो बांगडा, वीस किलो लालबी यासह फिशिंगच्या नौकांना 10 ते 25 किलो चिंगळं मिळत आहेत. समुद्रात ये-जा करण्यासह खलाशांचा खर्चही त्यातून भागत नसल्याचे समोर आले आहे.
वादळामुळे समुद्र खवळलेला असून मासे खोल पाण्याच्या दिशेने गेलेले आहेत. ‘यास’ वादळाच तडाखा बसणार नसला तरीही समुद्रातील पाण्याला करंट आहे. पाणी स्थिर नसल्यामुळे पाहीजे तशी मासळी मिळत नाही, असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. यंदाचा हंगाम मच्छीमारांसाठी यथातथाच गेला आहे. गतवर्षी पाऊस लांबल्यामुळे सुरवात उशिराने झाली. अधुनमधून पावसाळी वातावरणाने मच्छीमारांचा हिरमोड झाला आहे. मासेमारी हंगाम संपुष्टात येण्यासाठी चारच दिवस शिल्लक आहेत. यामध्ये काहीतरी हाती लागेल अशी आशा घेऊन समुद्रात जाणार्या मच्छीमारांच्या पदरी निराशा आली आहे. तौक्तेच्या तडाख्यातून मच्छीमारही सुटलेले नाहीत.