तोक्ते चक्रीवादळात महावितरणचे सात कोटींवर नुकसान

रत्नागिरी:- तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाची प्रचंड वाताहात केली. यामध्ये महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले. प्राथमिकदृष्ट्या 7 कोटीच्यावर नुकसानीचा आकडा गेला आहे. कंपनीने मोडलेल्या विद्युत खांबांसह गंजलेले खांब मिळून 3 हजार खांब बदलले. सुमारे 1 हजार 340 कर्मचार्‍यांनी हे शिवधनुष्य पेलले आणि अंधारात गेलेली 1 हजार 239 गावांमध्ये पुन्हा प्रकाश केला.

जिल्ह्यातील 1 हजार 239 गावे वादळात बाधित झाली. त्यामुळे 54 हजार 921 वीज ग्राहक अधारात गेले होते. महावितरण कंपनी अन्य जिल्ह्यातील पथके मागवून सुमारे 1 हजार 340 कर्मचार्‍यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पंधरा दिवसांनी जिल्ह्यात विद्युत पुरवठा सुरळीत झाला.

वर्षभरापूर्वी निसर्ग चक्रीवादळात सुमारे 30 ते 32 कोटीच्या दरम्यान महावितरण कंपनीचे नुकसान झाले होते. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना तौक्ते वादळाने कंपनीला मोठा झटका दिला. यात प्राथमिकदृष्ट्या 7 कोटीच्यावर नुकसान झाले आहे.
वादळामध्ये 1 हजार 929 खांब, कंडक्टर, 7 हजार 548 रोहित्र बंद पडले. त्यातील 3 पूर्ण खांबासकट उन्मळून पडले. 54 हजार 921 वीज कनेक्शन बंद पडली होती ती सुरू करण्यात आली. उच्च दाबाच्या 485 विद्युत खांब तर कमी दाबाचे 1 हजार 233 खांब पडले. महावितरण कंपनीने 1 हजार 340 कर्मचार्‍यांच्या जोरावर 15 दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत केला. वादळातील खांबांसह गंजलेले असे 3 हजार विद्युत खांब बदलण्यात आले.