तुषार साळवी यांची शिवसेनेतील शिंदे गटाच्या युवासेनेच्या तालुका युवाधिकारीपदी नियुक्ती

रत्नागिरी:- उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय तुषार साळवी यांची शिवसेनेतील शिंदे गटाच्या रत्नागिरी तालुका युवासेनेच्या तालुकायुवाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख राहूल पंडित, बिपिन बंदरकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचा गट सक्रिय झाल्यानंतर राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्याचा सपाटा लावला आहे. शिंदे गटाचे उपनेते, प्रवक्ता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी निवड करण्यात येत आहेत. श्री. पंडित यांची जिल्ह्याच्या दक्षिण जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर उर्वरित पदेही जाहीर केली जात आहेत. पक्षबांधणीसाठी शिवसेनेतील शिंदे गटाने पावले उचलली आहेत. युवा कार्यकर्ते तुषार साळवी यांनी सामंत यांच्या मागोमाग शिंदे गटात साथ धरली. गेल्या काही वर्षात रत्नागिरी तालुक्यातील युवा फळी मजबुत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते. मंत्री सामंत, उद्योजग अण्णा सामंत, किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत खिचडी वाटप सुरु केले. रुग्णांच्या नातेवाईकांना याचा लाभ दिला जात होता. क्रीडा क्षेत्रातील दोन गरजू खो-खो पटूंना सायकलचे वितरण करुन साळवी यांनी दातृत्व गुणाचे दर्शन घडवून दिले होते. उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुषार साळवी यांची नुकतीच रत्नागिरी तालुका युवाधिकारीपदी नियुक्ती झाल्यामुळे युवा वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार तालुक्यातील युवा फळी मजबुत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रोजगार मिळवून देण्यासाठी तालुक्यातील युवकांच्या नोंदणीचा कार्यक्रम लवकरच हाती घेणार आहे.

– तुषार साळवी, तालुका युवाधिकारी