तुलसी विवाहानंतर पूर्णगडमध्ये जोरदार राडा

रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड येथील किल्लेकरवाडी येथे किरकोळ कारणातून प्रौढेला शिवीगाळ करत लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवार 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वा.सुमारास घडली.

साक्षी विनोद सुर्वे,रिया सचिन सुर्वे आणि विनोद प्रभाकर सुर्वे (तिन्ही रा.किल्लेकरवाडी पूर्णगड,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात हेमलता महादेव सुर्वे (48,रा. किल्लेकरवाडी पूर्णगड,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,हे सर्व एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात जागे-जमिनीवरुन वाद सुरु आहेत.शनिवारी सायंकाळी हेमलता सुर्वे यांच्या घरी तुळशीचे लग्न होते.त्यासाठी वाडीतील लोक आणि संशतियही आले होते. लग्न झाल्यानंतर सर्व निघून गेले परंतू कोणीही अंगणातील बेडे लावले नाही.त्यामुळे हेमलता सुर्वे बडबडत होत्या.

ह्या गोष्टीचा राग आल्याने साक्षीने अंगणातील लाकडाने हेमलता सुर्वे यांना मारहाण केली.तर रियाने त्यांच्याशी झटापट करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून नुकसान करत तिघांनीही त्यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.