रत्नागिरी:- कोरोनामुळे रद्द करण्यात आलेले कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दादर-सावंतवाडी-दादर तुतारी विशेष रेल्वेगाडी मध्यरात्रीपासून कोकण रेल्वे मार्गावर धावत आहे. त्यासाठी 24 पासून आरक्षण सुरु झाले आहे. या गाडीत आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे.
कोरोनामुळे सर्व गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवात विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा सेवा बंद ठेवण्यात आली होती. मध्ये रेल्वेने सोडलेल्या चार गाड्या सोडल्यास अन्य फेर्या रद्द होत्या. जिल्हा बंदी उठवण्यात आल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर दादर-सावंतवाडी-दादर तुतारी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी मध्यरात्रीपासून प्रवाशांच्या सेवेत आली आहे. ही गाडी पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहे. दादरहून दररोज 00.05 वाजता सुटेल आणि ती सावंतवाडी रोडला दुपारी 12.20 वाजता पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास सावंतवाडी रोड येथून दररोज सायंकाळी 17.30 वाजता सुटेल. ती दुसर्या दिवशी दादरला पहाटे 06.45 वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वेस्थानकावर थांबणार आहे.
पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात या गाडीचे वेळापत्रक बदलेल. दादरहून दररोज मध्यरात्री 00.05 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला सकाळी 10.40 वाजता पोहोचेल.
तिचा परतीचा प्रवास सावंतवाडी रोड येथून दररोज सायंकाळी 18.50 वाजता होईल. ती गाडी दुसर्या दिवशी दादरला पहाटे 06.45 वाजता पोहोचेल.