तीन वर्षांच्या चिमुरडीच्या पोटावरून गेले कारचे चाक

खेड शहरातील मुक्कादम हायस्कूलसमोरील घटना

खेड:- खेड शहरातील मुक्कादम हायस्कूलसमोरील नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव कारने ३ वर्षांच्या चिमुरडीला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे चाक चिमुरडीच्या पोटावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

​मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले अफताब अहमद खान (वय ३२, सध्या रा. मदिना चौक, खेड) यांची पत्नी आणि ३ वर्षांची मुलगी पलक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नदीकाठच्या रस्त्यावरून घरी परतत होत्या. यावेळी वळणावर समोरून येणाऱ्या कारने (क्र. एम.एच. ०५ डी.ई. ०४५८) लहानग्या पलकला जोरदार धडक दिली.

​धडक इतकी भीषण होती की पलक खाली पडली आणि कारचे डाव्या बाजूचे चाक तिच्या पोटावरून गेले. या अपघातात पलकच्या पोटाला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे गाडी चालवल्याने हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

​या अपघातानंतर १० दिवसांनी म्हणजेच ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता खेड पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालक महेश अवधूत कारळे (रा. हेडगेवार कॉलनी, ब्राह्मण आळी, खेड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा (रजि. नं. ४४/२०२६) नोंदवण्यात आला आहे.