तीन महिन्यात जिल्हा रुग्णालयात १७६ मृत्यू

अतिदक्षता विभागात दर जास्त ; बालकांचे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प

रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांमध्ये ६ हजार ८६८ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अतिदक्षता विभागात मृत्यू होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. खासगी रुग्णालयातून अतिशय नाजूक अवस्थेत दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड जिल्हा रुग्णालयात एका दिवसत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळने जिल्हा रुग्णालयाचा गेल्या तीन महिन्याचा आढावा घेतला. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाची खाटांची संख्या ३०० आहे. आता रुग्णालयात २५० च्या वर रुग्ण दाखल आहेत. साथीच्या प्रादूर्भावानंतर ही संख्या वाढते. तेव्हा क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण होतात. व्हरांड्यात जादा खाटा टाकून त्यांच्यावर उपचार केले जातात. परंतु सध्या जिल्ह्यात साथ रोग नसल्याने रुग्ण कमी आहेत. जिल्हा रुग्णालयात आज सर्व विभाग आणि सोयी सुविधा उपलब्ध आहेत. परंतु वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना दर्जेदार सेवा देताना उपलब्ध वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक होते.

जिल्हा रुग्णालयात जुलै महिन्यात २ हजार १४१ रुग्णा दाखल झाले. त्यापैकी उपचार घेताना ५९ रुग्णांचा मृत्यू झाला. ऑगस्ट महिन्यात २ हजार ३९३ रुग्ण दाखल झाले. पैकी ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर सप्टेंबर महिन्यात २ हजार ३३४ रुग्ण दाखल झाले, त्यापैकी ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. तीन महिन्यात दाखल झालेल्या ६ हजार ८६८ रुग्णांपैकी १७६ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आहे.

जिल्हा रुग्णालयात अतिशय क्रिटिकल अवस्थेत आणि शेवटच्या स्टेपला असलेले रुग्ण खासगी रुग्णालयातून येतात. त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचाराचा फारसा फरक पडत नाही. या रुग्णांची संख्या अधिक आहे.
डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी