रत्नागिरी:- शासनाकडे विलनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाला सलग तिसर्या दिवशी जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मागील तीन दिवसात ये-जा करणार्या पावणेचार हजार फेर्या रद्द करण्यात आल्या असून दिड कोटी रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाला झाले. एसटी बंद असल्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणार्यांचा ओघ घटला असून शहरांमधील मुख्य बाजारपेठांवर परिणाम झाला आहे.
एसटी कर्मचार्यांनी अचानक पुकारलेल्या संपाला पहिल्या दिवशी जिल्ह्यातील नऊपैकी सात आगारांमधून चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसर्या आणि तिसर्या दिवशी शंभर टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले. बुधवारी (ता. 10) एसटीची एकही फेरी रस्त्यावरुन धावली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. अनेकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी खासगी वाहतुकीचा पर्याय अवलंबावा लागला. खासगी वाहतुकवाल्यांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारण्यात आल्याचे प्रकारही सुरु होते. बुधवारी रत्नागिरी शहरातील माळनाका येथील विभागिय कार्यालयासमोर सर्व कर्मचारी एकवटले होते. गेल्या तीन दिवसात ये-जा करणार्या पावणेचार हजार फेर्या रद्द करण्याचीवेळ एसटी प्रशासनावर आली. दिवसाला सव्वा लाख प्रवाशी ये-जा करतात. एसटीच्या फेर्या रद्द झाल्यामुळे तीन दिवसात पावणेचार लाख प्रवाशांची गैरसोय झाली. फेर्या रद्द केल्यामुळे तीन दिवसात सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान एसटी विभागाला सहन करावे लागले आहे.
शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून अनेकजणं खरेदीसाठी शहरांमधील मुख्य बाजारेपठांकडे वळतात. सध्या लग्नसराईचे दिवस असून कपडे, सोने खरेदीसाठी सर्वसामान्य धाव घेतात. एसटी बंदमुळे त्या ग्रामस्थांची गैरसोय झाली असून त्यांचा रत्नागिरी, चिपळूणसारख्या शहरांमधील मुख्य बाजारपेठांवरही परिणाम झाला आहे. दिवाळीच्या चार दिवसानंतर लगेचच संप सुरु झाल्यामुळे बाजारातील गर्दी घटली आहे. सुमारे चाळीस टक्केहून अधिक ग्राहक कमी झाल्याचे व्यापार्यांकडून सांगितले जात आहे.