तीनबत्तीनाका येथे बर्निंग कारचा थरार

चालकाच्या प्रसंगावधानाने दोघे बचावले; कारचे नुकसान

खेड:- शहरातील तीनबत्तीनाका येथील नगर परिषद कार्यालयासमोरील मार्गावर बुधवारी पहाटे ४.३७वाजण्याच्या सुमारास दापोली तालुक्यातील सातेरेजामगे येथून संगमेश्वरला जाणारी मारूती रिट कार जळून खाक झाली. कारमधील वडील व मुलगी बालंबाल बचावली. अपघाताची माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशमक दलातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून कारला लागलेली आग नियंत्रणात आणली. यात कारचे मोठे नुकसान झाले..

सातेरेजामगे येथे वास्तव्यास असलेले जमीर कादीर हे मारूती रिट कारमधून (एमएच ०४/एफए ०६९३). मुलीच्या परीक्षेसाठी संगमेश्वरला जात होते. कार नगर परिषद कार्यालयासमोर आली असता कारच्या इंजिनमधून धूर आला. ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर कार थांबवत लेकीसह ते तातडीने बाहेर पडले. पहाटेच्या सुमारास घडलेल्या बर्निंग थराराने नजीकच्या रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. या बाबत नगर परिषदेच्या अग्निशमन दलास कळवेल्यानंतर

फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, वाहनचालक गजानन जाधव तातडीने घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत कार जळून भस्मसात झाली होती. कारला लागणारी धुमसणारी आग शर्थीच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आणण्यात आली.