तिहेरी हत्याकांड; आणखी एका पोलिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव

रत्नागिरी:- तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यातील आणखी एक पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबत जिल्हा पोलिस दलाने प्रस्ताव दिला आहे. संबंधित कर्मचारी वाहतुक शाखेत बदली झाल्यामुळे त्या खात्याला प्रस्ताव दिला आहे. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी दलाने ही तिसरी कारवाई केली. जिल्हा पोलिस अधीक्षक नितिन बगाटे यांनी ही माहिती दिली.

बेपत्ता प्रकरणाचा तपास झाला नाही, हलगर्जीपणा केल्यामुळे ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह दोन पोलिस कर्मचारी अडचणीत आले. बेपत्तच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी चौकशी अंती पोलिस हवालदाराला निलंबित केले आहे. राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसारच, पहिली कारवाई पोलिस उपनिरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे सोपवण्यात आली.

६ जून २०२४ ला राकेश जंगम याचा खून करून त्याचा मृतदेह आंबा घाट येथे फेकून देण्यात आला होता. या खुनाच्या प्रकरणात मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने चौकशी दरम्यान राकेशची हत्या केल्याची कबुली दिली. दुर्वास पाटील याच्यासोबत या गुन्ह्यात विश्वास पवार आणि नीलेश भिंगार्डे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. मृत राकेश जंगम हा दुर्वास पाटील यांच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. २१ जून २०२४ राकेशची आई जयगड पोलिस ठाण्यात राकेश बेपत्ता असल्याचा तक्रार अर्ज दिला होता. पण त्याचा अर्जाकडे दुर्लक्ष केले. पोलिसांच्या या हलगर्जीपणाची गंभीर दखल घेऊन चौकशी अंती सोनावने नामक पोलिस हवालदाराला निलंबित केले आहे. या प्रकरणी आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करावे, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांनी वाहतूक शाखेला दिला आहे. लवकरच त्यावर अंमलबजावणी होईल. या प्रकरणी आतापर्यंत एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे.