तिसऱ्या लाटेत मृत्युदर रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान 

रत्नागिरी:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील ग्रामीण भागात अधिक परिणाम झाला असून या भागांमध्ये मृत्युदरही वाढल्याचे मृत्यू विश्लेषणात निदर्शनास आले आहे. विशेषत: रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मृत्युदर सर्वात जास्त असून दुसऱ्या लाटेत मृत्यूदरात रत्नागिरी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याने  येथील निर्बंध उशिरापर्यंत कायम होते. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता ग्रामीण भागातील सेवा‚सुविधा आणि उपचार नियमावली यावर लक्ष देणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने शासन नियोजन केव्हा सुरु करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मृत्युदर कमी असला तरी मृतांची संख्या मात्र ६० टक्क्यांनी वाढली असल्याचे आढळले आहे. तसेच रुग्णांची संख्या जवळपास दुपटीहून अधिक वाढली आहे. मार्च ते डिसेंबर २०२० काळात राज्यात १९ लाख ३१ हजार रुग्ण बाधित झाल्याचे आढळले, तर ५३ हजार ३४५ रुग्णांचा मृत्यू झाला. या काळात मृत्युदर २.७६ टक्के होता. २०२१ मध्ये रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होऊन सुमारे ४७ लाख ३४ हजार जणांना करोनाची बाधा झाली असून मृतांची संख्या ८५ हजार ६६४ वर गेली आहे. या काळात मृत्युदर मात्र १.८१ टक्के राहिला आहे.दुसऱ्या लाटेमध्ये  वेगाने पसरणाऱ्या करोनाने ग्रामीण भागातही हाहाकार उडविला. राज्यात २०२१ मध्ये सर्वाधिक ३.२१ टक्के मृत्युदर नांदेडमध्ये आढळला आहे. त्या खालोखाल रत्नागिरीमध्ये ३.११ टक्के आढळला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा मृत्यूच्या दरात दुसर्‍या क्रमांकावर होता.यावर्षी दर आठवडयाचा मृत्युदर एप्रिलमध्ये जवळपास अडीच टक्क्यांवर गेला होता. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला आणि हे प्रमाण हळूहळू कमी झाले आहे. डिसेंबरमध्ये राज्यातील रुग्णसंख्या वाढत असली तरी आठवडयाचा मृत्युदर अजूनही एक टक्याच्याही खाली आहे.दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात करोनाचा प्रसार वेगाने होत गेला. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण अधिक आढळले आहे. आता करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट आल्यास ग्रामीण भागात आरोग्याच्या सोई‚सुविधा, प्राणवायूचा साठा, उपचार नियमावलीचे पालन, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच या भागांमध्ये तुलनेने लसीकरण कमी झाल्यामुळे लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.पहिल्या लाटेमध्ये करोनाचे सर्वाधिक म्हणजे सुमारे १६ हजार मृत्यू हे ६० ते ७० वयोगटातील रुग्णांचे झाले होते. याहीवर्षी हेच चित्र कायम असून सर्वाधिक २३ हजार ५२७ मृत्यू याच वयोगटात झाले आहेत. सर्वाधिक मृत्युदर मात्र गेल्या आणि याही वर्षी ७० ते ८० वयोगटातील रुग्णांमध्ये आढळला आहे. त्यामुळे आता ‘ओमायक्रॉन’सह तिसऱ्या लाटेची शक्यता असताना शासनासह प्रशासनाने पुर्व तयारी केली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.