रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्याचे बजेट अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. यामध्ये महिलांना बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. ही सवलत मार्च महिन्यात लागू झाल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील महिला प्रवाशांची संख्या 30 टक्के वाढली असल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाने दिली.
‘वाट पाहीन पण एसटीने जाईन” हे ब्रीदवाक्य अनेकदा आपल्या कानावर पडले असेल. ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून एसटीची ओळख आहे. महाराष्ट्रातील गाव खेड्यापर्यंत आज लाल परी पोहोचली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांना या बसचा मोठा आधार आहे. नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यात एसटी बसमध्ये महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नंतर विशेषतः नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळाला. हाफ तिकीट म्हटले की पैशांची अर्धी बचत होते ही भावनाच महिलांसाठी समाधानकारक ठरली आहे. ज्या महिला एसटी ने प्रवास करत नव्हत्या त्या महिला देखील आता एसटीने प्रवास करू लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आगारनिहाय माहिती काढली असता सरासरी 30 टक्के महिला प्रवासी संख्या वाढली असल्याची माहिती एस.टी.कडून देण्यात आली.









