तासिका तत्त्वावरील अध्यापकांची दिवाळी गोड; मानधनात वाढ करण्याचा निर्णय

रत्नागिरी:- उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालये/ संस्था तसेच अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत व्याख्याते तसेच तासिका तत्त्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तासिक तत्त्वावर तसेच अभ्यागत अध्यापक म्हणूक काम करणार्‍या प्राध्यापकांना दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी मिळाली आहे.

उच्च व  तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील व उच्च शिक्षण  संचालनालयाच्या अधिपत्याखालील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सैद्धांतिक, प्रात्यक्षिके आदी कामांसाठी शासन निर्णयानुसार अभ्यांगत तसेच तासिक तत्त्वावर काम करणार्‍या अध्यापकांचे मानधनाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाद्वारे लागू करण्यात आलेले दर सुधारित करण्याची प्राध्यापकांची मागणी शासनाच्या विचाराधीन होती. या बाबत सर्वांगीण विचार करुन शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर तासिका तत्त्वावर तसेच गेस्ट लेक्चरर (अभ्यागत) म्हणून काम करणार्‍या प्राध्यापकांना खूष करणारी बातमी दिली आहे.   राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अध्यापकांना ट्विटरद्वारे देखील ही  खूषखबर दिली आहे.

शासन निर्णयानुसार शासकीय महाविद्यालये, संस्था  तसेच  अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नियुक्त करण्यात येणारे अभ्यागत  व्याख्याते तसेच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.