रत्नागिरी:- कृषी विभागाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने नाराजीचा सूर निघत आहे. कारण, रत्नागिरी तालुक्यामध्ये सध्या फक्त सात कृषी सहाय्यक कार्यरत असून त्यांच्याकडे अतिरिक्त गावांचा पदभार असल्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे मुश्किल झाले आहे. त्यातही पाचजण आपापल्या जिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहेत.
रत्नागिरी तालुक्यामध्ये कृषी विभागाची चार मंडळ कार्यालय अस्तित्वात आहेत. त्यामध्ये रत्नागिरी, पावस, मालगुंड व पाली यांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याकरिता कृषी सहाय्यक हा महत्वाचा दुवा समजला जातो. एका मंडळ कार्यालयामध्ये १२ कृषी सहाय्यक पदे अपेक्षित असतात. त्याप्रमाणे तालुक्यात ४८ कृषी सहाय्यक असणे अपेक्षित आहे. शासन निर्णयानुसार यापूर्वी या प्रत्येक मंडळ कार्यालयामध्ये कृषी सहाय्यकांची संख्या परिपूर्ण होती; परंतु सध्या या मंडळ कार्यालयांतर्गत गावांमध्ये कृषी सहाय्यक नसल्यामुळे कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे असलेल्या कृषी सहाय्यकांना अतिरिक्त गावांचा पदभार सांभाळावा लागत आहे. मागील वर्षी या तालुक्यांमध्ये नऊ कृषी सहाय्यक कार्यरत होते. त्यातील दोन कृषी सहाय्यकांनी लोकसभा निवडणुकीनंतर आपली बदली गावाकडे करून घेतल्याने सध्या सात कृषी सहाय्यक कार्यरत आहेत. त्यातील पाच कृषी सहाय्यक विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या गावी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांमध्ये तालुक्यामध्ये कृषी सहाय्यक शोधण्याची वेळ येणार आहे.
दर पाच वर्षांनी कृषी सहाय्यकांची पदे भरली जातात. त्यामध्ये स्थानिक उमेदवारांना समाविष्ट केले जात नाही. कोकण मंडळामध्ये भरती प्रक्रियेमध्ये विदर्भ, मराठवाडा आदी भागातील उमेदवार अर्ज भरत असल्यामुळे त्यांची नेमणूक केली जाते. सेवेमध्ये पक्के झाल्यानंतर सदर उमेदवार त्यांच्याकडील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपली बदली करून घेतात. त्यामुळे या जागा रिक्त होतात. ही साखळी गेली अनेक वर्ष तालुक्यामध्ये सुरू आहे.
या परिसरामध्ये कृषी सहाय्यकांची पदे भरली जातात. त्यामध्ये परजिल्ह्यातील उमेदवारांची भरती होते. सुरवातीची तीन-चार वर्ष कृषी सहाय्यक प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यानंतर प्रत्येकजण टप्प्याटप्प्याने आपल्या बदल्या करून घेतात. त्यामुळे कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अडचणीचे ठरते. यासाठी जिल्ह्यातील तरुण उमेदवारांना नियुक्ती दिल्यास ही समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकते. असे मत नाखरे ग्रामपंचायत सरपंच विजय चव्हाण यांनी व्यक्त केले.