तालुकाध्यक्ष पदावरून रत्नागिरी राष्ट्रवादीत दोन गट

रत्नागिरी:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदासाठी एकमत न झाल्यामुळे कोअर कमिटीने नाव निश्‍चित करुन जिल्हाध्यक्षांना सुचवावे अशा सुचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. तालुकाध्यक्ष नियुक्तीबाबत एकमत न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले आहेत.

नाना मयेकर यांच्या मृत्यूनंतर रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष पद रिक्त झाले. त्यांच्या जागी नियुक्ती देण्यासंदर्भातचा विषय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे शनिवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. अध्यक्षपदासाठी पाच नावे पुढे आली होती. त्यामध्ये जुने-नवे वादाला तोंड फुटले होते. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते रामभाऊ गराटे, बबलू कोतवडेकर, मिलिंद कीर, बाळकृष्ण लवंदे यांच्यासह राजन सुर्वेचे नाव पुढे होते. रामभाऊ गराटे हे पूर्वी तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत होते; परंतु सर्वांना एकजुट करण्यासाठी त्यांना संधी दिली जावी अशी मागणी काहींनी केली. पक्षाने जबाबदारी दिल्यास ती स्विकारण्यास तयार असल्याचे मिलिंद कीर यांच म्हणणं होते. राजन सुर्वे इच्छुक असल्याची माहितीही काहींनी सांगितले. यावरून बैठकीत एकमत होऊ शकले नाही. जुने-नवीन वादाला तोंड फुटले. यावर तोडगा काढत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, सुदेश मयेकर, मिलिंद कीर, बबलू कोतवडेकर, निलेश भोसले यांनी कोअर कमिटी तयार करून याबाबत लवकरात लवकर एक मताने तालुका अध्यक्ष निवडीबाबत एकमत करून अंतिम नाव पुढे करावे असे आदेश दिले आहेत.