रत्नागिरी:- जुलै महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला असून जिल्हा परिषदेचे 181 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अंतिम अहवाल तयार झाला असून तात्पुरत्या दुरुस्तीसाठी 22 कोटी 22 लाख रुपयांची आवश्यक आहे. तसा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.
जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. 21 व 22 जुलैला सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये पडलेल्या अति मुसळधार पावसाने मोठ्या नद्यांना पूर आला. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांमध्ये भुस्खलन झाले. गावांचा संपर्क तुटला, रस्ते खचले, पूल वाहुन गेले. चिपळूण, खेड शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातील स्थितीही गंभीर झाली होती. जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा अंतिम अहलवा नुकताच प्रशासनाने तयार केला आहे. सर्वाधिक नुकसान चिपळूण बांधकाम विभागाचे 111 कोटी 26 लाख रुपये आहे. रत्नागिरी विभागाचे 69 कोटी 90 लाख रुपयांचे नुकसान आहे. 858 रस्त्यांचे 135 कोटी, 105 साकवांचे 21 कोटी 92 लाख, 14 इमारतींचे 1 कोटी 38 लाखाचे नुकसान झाले आहे. अजुनही अनेक गावांतील रस्ते खचल्यामुळे वाहतूकीसाठी बंद आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीसाठी 22 कोटी 22 लाखाची गरज असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडून प्रशासनाला सादर केलेला आहे. जिल्हा नियोजनसह आत्पकालीन निधीमधून मागणी करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह बाधित गावांमधील सदस्यांनी आढावा घेऊन घटनास्थळांची प्रत्यक्ष पाहणीही केली होती. तिवरे, गणेशवाडी, पोसरे, खडीकोळवण यासारख्या दरडग्रस्त गावांमधील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे चित्र आहे. चिपळूण तालुक्यात
231 तर खेडमध्ये 275 रस्त्यांची दुरुवस्था झाली आहे. तेथील नुकसानीसाठी अनुक्रमे 32 कोटी 84 लाख आणि 40 कोटी 84 लाख लागणार आहेत. संगमेश्वर तालुक्यात 116 रस्ते बाधित असून त्यासाठी 18 कोटी 8 लाखांची गरज आहे.