दिव्यांग बांधवांची सकाळपासून मोठी गर्दी; प्रशासनाच्या समन्वयाचा फज्जा
रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात आज सकाळपासून दिव्यांग अपंग बांधवांची मोठी गर्दी उसळली असून, तहसीलदारांनी काढलेल्या एका पत्रकामुळे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे दर्शन घडले आहे. विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) काढणे व ते आधार कार्डशी संलग्न करण्याबाबत तहसीलदारांनी दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी पत्रक जारी केले. मात्र, या पत्रकाची कोणतीही पूर्वकल्पना जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात न आल्याने संपूर्ण यंत्रणा अडचणीत सापडली.
या पत्रकाच्या आधारे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग अपंग बांधव जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने रुग्णालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. दिव्यांग बांधवांकडून ‘तहसीलदारांनी पत्रक काढण्यात आले आहे’ असे सांगण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. महत्त्वाचे म्हणजे, अशी पत्रके जारी करताना आरोग्य विभागाशी चर्चा करणे व आवश्यक पूर्वतयारी करणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात प्रशासनातील समन्वयाचा पूर्ण अभाव दिसून आला. प्रशासनाच्या एका विभागाने काढलेल्या आदेशाचा भार दुसऱ्या विभागावर टाकण्यात आल्याने सर्वसामान्य दिव्यांग नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असतानाही जिल्हा रुग्णालयात चोवीस तास सेवेत कार्यरत असलेले एकमेव वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगवीकर यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेतली. दिव्यांग अपंग बांधवांना गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आणि सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तहसीलदारांकडून अशी पत्रके जारी करताना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना विश्वासात घेणे, नियोजन करणे आणि स्पष्ट सूचना देणे आवश्यक होते. मात्र ते न करता थेट पत्रक काढल्याने निर्माण झालेला गोंधळ हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे द्योतक असल्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.
सुरक्षा रक्षकांची लागलेली कसोटी
या संपूर्ण गोंधळाच्या प्रक्रियेत सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. एकीकडे आपली कामे मार्गी लावण्यासाठी आलेले दिव्यांग नागरिक, तर दुसरीकडे अचानक वाढलेली लोकसंख्या या दोहोंमध्ये समतोल राखणे हे सुरक्षारक्षकांसाठी खडतर आव्हान ठरले होते. केवळ शिस्त राखणे एवढ्यापुरती त्यांची जबाबदारी मर्यादित न राहता, दिव्यांग अपंग बांधवांना आधार देणे, योग्य ठिकाणी पोहोचवणे, गर्दी नियंत्रित करणे आणि संभाव्य वाद टाळणे ही सर्व कामे त्यांच्यावर आली. वाढत्या ताणतणावाच्या वातावरणात संयम न सोडता, मानवी संवेदनशीलतेने काम करणे हीच त्यांच्या कामगिरीची खरी कसोटी होती.अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी दाखवलेली तत्परता व समजूतदारपणा कौतुकास्पद ठरत आहे.









