Tuesday, July 21, 2026
spot_img
Home रत्नागिरी तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर अज्ञात वाहनचालक फरार; गुन्हा दाखल

तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर अज्ञात वाहनचालक फरार; गुन्हा दाखल

आंबा घाटातील घटना

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९ जुलै रोजी पहाटे घडली. रामा बाळू माश्याळ (वय ३०, रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर, कर्नाटक) असे मयताचे नाव आहे. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामा माश्याळ हे आपल्या ‘युनिकॉर्न’ मोटारसायकलवरून (KA-28-EZ-0272) सापुचेतळे (लांजा) येथून विजापूरच्या दिशेने निघाले होते. आजीच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी ते गावी जात होते. १९ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातील दख्खन गावच्या हद्दीतील अरुंद रस्त्यावर असताना, समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने कोणतीही मदत न करता किंवा जखमीला रुग्णालयात नेण्याचे सौजन्य न दाखवता घटनास्थळावरून पोबारा केला. गंभीर जखमी झाल्यामुळे रामा माश्याळ यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी बाबु मल्हारी तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार (१८४, १३४ अ/ब, १८७) गुन्हा नोंदवला आहे. या अपघाताचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.