तयार भातशेतीचे अक्षरशः पाणी पाणी

परतीच्या पावसाचा फटका; 40 टक्के शेतीचे नुकसान 

रत्नागिरी:- तयार होऊन कापलेली भातशेती नदीच्या पुराच्या पाण्यात भिजलेय. तीन ते चार महिने मेहनत करुन पिकवलेलं भात वाया गेलं आहे. काहींना कोंब फुटलेत. भात वाळवलं तरी त्याचा काहीच उपयोग नाही. ते उचलायचं आणि फेकुन द्यायचं, अशी हतबलता मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

शुक्रवारी (ता. 16) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासात सरासरी 16.70 मिमी पाऊस झाला. त्यात रत्नागिरीत सर्वाधिक 65.40 मिमीची नोंद झाली. मंडणगड 3.90, दापोली 5.40, खेड 9.30, गुहागर 0.90, चिपळूण 8.10, संगमेश्‍वर 41.80, लांजा 10.20, राजापूर 5.30 मिमी पाऊस झाला. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा गुरुवारी (ता. 15) सायंकाळी अरबी समुद्रात विलीन झाला. त्यानंतर जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला; मात्र रत्नागिरी तालुक्यात रात्रभर पाऊस पडतच होता. शुक्रवारी सकाळी पावसाने उघडीप दिली. पण दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात राजापूरमधील अर्जुना, कोदवली, लांजा येथील मुचकुंदी, रत्नागिरीतील काजळी, बावनदी तर संगमेश्वरच्या शास्त्री नदी किनार्‍यावरील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात अनेकांची कापलेली शेती वाहून गेली,  तर उभी राहीलेले भात आडवी होऊन पाण्यातच होती. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई,  हरचेरी, पोमेंडी, कजरघाटी, सोमेश्वर, निवळी, कोंडवी, बावनदी, टिके येथील शेतकर्‍यांना फटका बसला आहे. निवळीत बावनदीच पाणी किनारा ओलांडून आल्यामुळे भाताची उडवी वाहून जाण्याची भीती होती. उघडीप मिळाल्यामुळे ढगाळ वातावरणातही शेतकरी भिजलेले भात वाळवण्यासाठी धडपडत होते. काजरघाटीतील शेतकर्‍यांनी तांदूळ नाहीत तर नाही किमान कणी मिळेल या हेतून ओले भात झोडूले. ते भात सुकवले तरीही त्याल कुबट वास येतो. तो तांदुळही विकणे दूरच खाण्यायोग्यही राहत नाही. चार महिन्याच्या मेहनतीवर पाणी फेरल्यामुळे शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. कोरोनामुळं आधीच कंबरडं मोडलेल्या शेतकर्‍याचा घास ही निसर्गाने हिरावून घेतला आहे. भाताबरोबर नाचणीचेही पिक वाहून गेले आहे.