तनाळी रामवाडी येथील विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याची सुटका

वनखात्याच्या बचाव पथकाने दिले जीवदान

चिपळूण:- तनाळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याच्या बचाव पाथकाने बाहेर काढून सुटका केली. ही घटना आज मंगळवारी सकाळी घडली.
तनाळी रामवाडी येथे दि.०२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजणेच्या सुमारास श्री. प्रभाकर बाबाजी जावळे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती सरपंच विजय बोंबले यांनी दुरध्वनीव्दारे वनपल चिपळूण सत्ताप्पा स. सावंत यांना दिली. मिळालेल्या माहितीचे अनुषंगाने वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहा. वनसंरक्षक श्रीम. प्रियंका पं. लगड घटनास्थळी उपस्थित राहिल्या. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. दर विहिर ही ४० फुट खोल असून त्यात असलेल्या १० फुट खोल पाण्यात बिबट्या असल्याचे आढळून आले. बिबट्या हा भक्षाचा पाठलाग करत असताना पहाटेच्या दरम्यान विहिरीत पडला असल्याचे दिसून येते. सदर विहीरीमध्ये पिंजरा दोरीच्या सहाय्याने वनविभागाचे बचाव पथक व ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीमध्ये सोडल्यानंतर विहीर ही खोल व त्याच्यामध्ये पाणी असल्याने एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबटयाला सुखरूप पिंजऱ्यात घेण्यात आले. विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. काणसे यांनी पाहणी केली असता सदरचा बिबट्या हा मादी प्रजातीचा असुन त्याचे वय साधारणपणे १.५ ते २ वर्षाचा असावे तपासणी

झालेनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे करिता सुस्थितीत असलेची खात्री झाल्याने वन विभागाचे बचाव पथकाने सदर बिबट्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

वन विभागाचे बचाव पथकामध्ये श्री. सरवर स. खान वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण, श्री. सत्ताप्पा स. सावंत वनपाल चिपळूण, श्री. अनंत ना. मंत्रे वनरक्षक वनोपज तपासणी नाका पोफळी, श्री. दत्ताराम रा. सुर्वे वनरक्षक फिरते पथक रत्नागिरी (चिपळूण), श्री. प्रणीत सु. कोळी वनरक्षक फिरते पथक रत्नागिरी (चिपळूण), श्री. विशाल अ. पाटील फिरते पथक रत्नागिरी (चिपळूण), वाहनचालक नंदकुमार कदम, मदतनीस संजय आंबोकर, तनाली रामवाडी गावचे सरपंच, पोलीस पाटील तनाली व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढण्यात आले. सदर बचाव पथकास श्रीम. गिरीजा न. देसाई विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), श्रीम. प्रियंका पं. लगड सहा. वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण), श्री. सरवर स. खान वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण यांचे मार्गदर्शन लाभले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र.१९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.