तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई: ना. सामंत

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून चिपळूण येथे पाहणी

रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई – गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तिघाजणांच्या तज्ज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सागंतानाच चिपळूणकरांना कोणताही त्रास होणार नाही आणि भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केल्याच्याही पालकमंत्री श्री. सामंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी पालकमंत्री श्री. सामंत यांनी बुधवारी सकाळी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रातांधिकारी आकाश लिगाडे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, मुख्य अभियंत्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक अडचणीमुळे ही दुर्घटना झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या नेमलेल्या समितीकडून या दुर्घटनेची चौकशी होईल. ही समिती शहानिशा करेल, त्यांच्या चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. चिपळूणकरांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी 10 तारखेपर्यंत सर्व्हीस रोडच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुलाचे काम सुरु राहील. आजपासून सर्व्हीस रोडचे काम सुरु होईल. भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही सूचना केली आहे.