तक्रारदाराचे समाधान हेच पोलीसांचे प्रथम कर्तव्य

निरोप समारंभात डिवायएसपी विनित चौधरी यांचे प्रतिपादन

रत्नागिरी:- रत्नागिरी हा कायद्याचे पालन करणारा जिल्हा आहे. त्यामुळेच येथे गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागात मी काम केले आहे. येथे काम करताना वेगळेचे समाधान मिळते. आपण जनतेसाठी आहोत. येणार्या प्रत्येक नागरिकाला न्याय, तसेच त्याचे हक्क देता येतील याकडे आपण प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. तक्रारदाराचे समाधान करणे हे पोलीसांचे प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मावळते उपविभागिय अधिकारी विनित चौधरी यांनी केले.

रत्नागिरी उपविभागिय अधिकारी विनित चौधरी यांची अलिबाग येथे बदली झाल्यामुळे रत्नागिरी शहर पोलीसांच्यावतीने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी उपविभागिय अधिकारी निलेश माईनकर, पोलीस निरिक्षक महेश तोरसकर,सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव, कुलदिप पाटील, उपनिरिक्षक शितल पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. यावेळी शहर पोलीस स्थानकाच्यावतीने श्री.चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री.चौधरी म्हणाले, पोलीस दलात काम करताना जनतेला केंद्र बिंदू मानून काम केले पाहिजे. पोलीस कायद्याचे पालन करण्यासाठी आहेत. पोलीस स्थानकात येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला सारखा असला पाहिज. त्याला न्याय देण्याचा प्रयत्न पोलीसांकडून झाले पाहिजे. पोलीस अधिकार्यांसह अंमलदारांचा जनतेसोबत चांगला संवाद असला पाहिजे. पोलीस – जनता संवादामुळे अनेक प्रश्न तात्काळ सुटतात, अनेक घटना टाळता येतात याचा अनुभव मला अनेक वेळा आल्याचे श्री.चौधरी यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील अलोरे, गुहागर, ग्रामीण व दोन वेळा रत्नागिरी शहर पोलीस स्थानक व पुन्हा उपविभागिय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली.याकाळात मला सर्वच राजकिय पक्ष, सामजिक संस्था, व्यापारी, उद्योजक, रिक्षा संघटना, सरकारी कर्मचारी संघटना, पत्रकार बंधू, भगिनी यांची चांगली साथ मिळाली. याच्या सहकार्यामुळेच मी यशस्वीपणे काम करु शकलो, त्यांचे मी आभारी असल्याचेही श्री.चौधरी यांनी सांगितले.
आता काळ बदलत आहे. माझ्या कामाची सुरुवात अलिबाग येथे झाली आहे. आता निवृत्तीच्या वेळीही माझी नियुक्ती अलिबागला झाली आहे. या योगायोग आहे. मी पोलीस उपनिरिक्षक म्हणून काम केले आहे. तेव्हा माPयासोबत काम केलेले अंमलदार आजही माझी आठवण काढतात. अधिकारी बदलून गेल्यानंतरही आपली आठवण काढतील असे काम आपण ज्या ठिकाणी कार्यरत आहोत. त्या ठिकाणी केले पाहिजे असेही श्री.चौधरी यांनी सांगितले.
यावेळी नूतन उपविभागिय अधिकारी निलेश माईनकर यांनी आपण श्री.चौधरी यांच्यासारखे सर्वांना सांभाळून काम करण्याचा प्रयत्न करु असे सांगत. सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी वेळेत काम केले पाहिजे, अर्जांचा निपटारा तात्काळ करा. मोकळ्या वेळात जनतेशी संवाद साधा, आपल्या बीटमध्ये गस्त घाला. त्यामुळे गुन्हे रोखण्यास मदत होईल. पोलीस फिरत आहेत. त्याचे लक्ष आहे. असे चित्र निर्माण झाल्यानंतर गुन्हेगारही गुन्हे करायला घाबरतात. पोलीसांनी गस्त घालताना त्यांचे निरिक्षण उत्तम असले पाहिजे असेही श्री.माईनकर यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरिक्षक महेश तोरसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस उपनिरिक्षक शितल पाटील यांनी केले.

निलेश माईनकर यांनी पदाभार स्विकारला
रत्नागिरी उपविभागिय पोलीस अधिकारी पदाचा पदभार पोलीस उपअधिक्षक (गृह) निलेश माईनकर यांनी स्विकारला असून त्यांनी अधिकारी कर्मचार्यांना सुचना दिल्या. मावळते उपविभागिय अधिकारी श्री.विनित चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले.