तंबाखूमुक्त शाळा अभियान संथगतीने 

अवघ्या 580 शाळा तंबाखूमुक्त; फेब्रुवारी अखेरची डेडलाईन 

रत्नागिरी:- व्यसनांच्या विळख्यातून युवा पिढीला वाचवण्यासाठी शासनाने तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविले आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील 3,336 शाळांपैकी 580 शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. यामध्ये लांजा तालुक्याने भरारी मारली आहे. उर्वरित शाळा फेब्रुवारीपर्यंत शाळा तंबाखू मुक्त करावयाच्या आहेत.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. शाळेत विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होतो. हे लक्षात घेऊन तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार 11 निकष निश्‍चित केले. शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक यांना तंबाखूमुक्त व्हावे लागणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत याची अंमलबजावणी होत आहे. आतापर्यंत 3,336 शाळांपैकी 1,169 शाळांनी अ‍ॅपवर नोंदणी केली. त्यातील 569 शाळा तंबाखु मुक्तीचे पुरावे सादर करण्यात यशस्वी ठरल्या. त्या तंबाखु मुक्त शाळा म्हणून घोषीत झाल्या आहेत. अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या 428 शाळांना आवश्यक पुरावे सादर करता आले नाहीत. त्यांना भविष्यात संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील 1 हजार 871 शाळा तंबाखुमुक्तीपासून दूर आहेत. त्यांना फेब्रुवारी 2021 पर्यंतची डेडलाईन आहे. लांजा तालुक्याने चांगली भरारी मारली असून खेड तालुका सर्वात मागे आहे.

तंबाखूमुक्त शाळेत शिक्षक, विद्यार्थी वा इतरांना तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही, शाळेत समिती स्थापन करणे, तंबाखू सेवन करणे गुन्हा असल्याचे फलक लावणे, तंबाखूचे दुष्परिणाम व नियंत्रणाचे फायदे याची माहिती देणे, मुख्यध्यापकांकडे तंबाखू उत्पादन कायद्याची प्रत ठेवणे, तंबाखू मुक्तीसाठी डॉक्टरांची मदत घेणे, शाळेत माहिती सत्रासह दंत व आरोग्य तपासणी करणे, तंबाखू मुक्तीचे कार्य करणार्‍यांचा सत्कार करणे व तंबाखू मुक्त शाळा, परिसर असा फलक लावणे आणि शाळा परिसरात तंबाखु व अन्य पदार्थ विक्रीवर बंधने घालणे आवश्यक आहे.