रत्नागिरी:- डिसेंबर महिन्याच्या अखेरपासूनच घाऊक बाजारात आंब्याची चाहूल लागायला सुरुवात होते. त्यानुसार आता आंब्याच्या हंगामाची चर्चा सुरू झाली आहे. यावर्षी कोकणातून येणारा अस्सल हापूस आंबा कमीच आहे. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यात भर पडली असून उत्पादनात घट होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.
यावर्षी कोकण किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात नारळ, पोफळीच्या बागांबरोबरच काजू आणि आंब्याच्या झाडांचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून गेल्या आहेत. झाडेच कमी असल्याने यावर्षी आंब्याचे उत्पादनही कमीच असणार असल्याचे कोकणातील आंबा उत्पादक सांगत आहेत. त्यामुळे मुंबईच्या बाजारात यावर्षी कोकणातील हापूस कमी प्रमाणात पाहायला मिळणार आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून वाशीच्या घाऊक बाजारात कोकणातून हापूस आंब्याच्या मुहूर्ताच्या पेट्या यायला सुरुवात होते. त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून हापूस आंब्याचा हंगाम सुरू होतो. फेब्रुवारी ते मार्च आणि एप्रिल ते मे हे हापूस आंब्याचे दोन मुख्य हंगाम मानले जातात. हंगामाच्या सुरुवातीला आंब्याच्या 5 ते 6 गाड्या दररोज येतात. मात्र मुख्य हंगामात फक्त आंब्याच्या 100 ते 200 गाड्या बाजारात येतात. एका दिवसाला आंब्याच्या सुमारे एक लाख पेट्या बाजारात येतात. एका दिवसाला एक लाख पेट्या येणे म्हणजे हंगाम चांगला मानला जातो. मुंबई घाऊक बाजार हा आंब्यांसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. यावर्षी ही परिस्थिती असणार की नाही याबाबत व्यापारी साशंक आहेत.
काजू-आंब्याची जुनी झाडे मुळापासून कोसळली आहेत. झाडे पूर्वीसारखी उभी राहण्यासाठी वेळ लागेल. आंब्याची झाडेच नाहीत, तर आंबे येणार कुठून? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. यामुळे यावर्षी आंब्यांचे उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता आहे. यावर्षी झाडांचे नुकसान झाल्यामुळे आंब्यांचे प्रमाण कमी असणार असे दिसत आहे. तग धरून राहिलेल्या झाडांना किती मोहोर येतोय आणि त्याला कशी फळधारणा होतेय आणि त्याला वातावरण कशी साथ देतेय यावर सर्व काही अवलंबून आहे.
गेले दोन दिवस ढगाळ वातारण आहे. त्यामुळे किती रोग पसरेल हे आताच सांगणे शक्य नाही. ही परिस्थिती हानीकारक आहे. थंडी नसल्यामुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. सध्या आलेल्या मोहोराला फळधारणेसाठी पुरक परिस्थिती नाही. हे वातावरण असेच राहीले तर बागायतदार अडचणीत येतील. दर आठ दिवसांनी फवारणी करावी लागत आहे. थ्रिप्सचा अटॅक दिसत आहे. आलेल्या मोहोराला लागलेली कणी लागली गळून जाण्याची भिती निर्माण झाली आहे.