डोर्लेत वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी उपोषणाची हाक 

रत्नागिरी:- तालुक्यातील डोर्ले येथील घवाळवाडी ते खोतमळी दरम्यानचे जीर्ण झालेले 19 पोल 27 मार्च रोजी पडले असून, विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असून, नुकसान भरपाई न मिळाल्यास महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन अजय तेंडुलकर यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिले.

डोर्ले येथील विद्युत खांब खराब झाल्याची माहिती तेंडुलकर यांनी एक वर्षापूर्वी महावितरणला दिली होती. कधीही तुटण्याच्या अवस्थेत असलेले हे पोल तत्काळ बदलून मिळावेत, अशी मागणीही त्यांनी महावितरणकडे केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर दि. 27 मार्च रोजी हे पोल तुटून पडले. यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. मागील दहा दिवस येथील ग्रामस्थ अंधारात चाचपडत आहेत. विजेअभावी पंप बंद असल्यामुळे बागायती, भाजीपाला यांना पाणी उपलब्ध होत नाही. येथील शेतकरी अजय तेंडुलकर यांनी आंब्यांची कलमे, सुपारीची झाडे, नारळाची झाडे व हापूस कलमांची नर्सरी केली आहे. या मिळकतीमधून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा करणे अशक्य होत आहे. नर्सरीतील रोपे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. नारळाच्या झाडांनाही पाणी देणे शक्य होत नसल्याने त्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

तेंडुलकर यांनी घवाळवाडी ते खोतमळी दरम्यानचे विद्युत पोल खराब झाल्याची माहिती महावितरणला एक वर्षापूर्वीच कळवली होती. याबाबत त्यांनी महावितरणकडे पत्रव्यवहारही केला होता. मात्र, याची दखल न घेतल्याने अखेर हे पोल तुटून पडले. मागील दहा दिवस विद्युत पुरवठा बंद असल्याने येथील सर्वच कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे येथील लोकांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई न मिळाल्यास महावितरणच्या रत्नागिरी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला होता.