डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी १६१ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर

रत्नागिरी:- शासनाकडून राबविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६१ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यामधून १ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रस्ताव हे विहिरींचे आहेत.

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून कृषी स्वावलंबन योजनेची अंमलबजावणी केली जाते. त्यात अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांना स्वयंपूर्ण करणे यासाठी नवीन विहीर बांधणे, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग अशी कामे घेता येतात. तसेच शेतकर्‍यांना वीज जोडणी आकार, पंप संच, शेततळयांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच या बाबीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. स्व. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकर्‍यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात येतो. यामध्ये नवीन विहीरीला २ लाख ५० हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार रुपये, इनवेल बोअरिंग २० हजार रुपये, पंपसंच २० हजार रुपये, वीज जोडणी आकार रुपये १० हजार, शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण १ लाख रुपये, ठिबक सिंचन संघ रुपये ५० हजार, तुषार सिंचन २५ हजार रुपये या मर्यादित अनुदान देय आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १६१ प्रस्तावांना मंजूरी मिळाली आहे. त्यातील ५३ नवीन विहिरीचे प्रस्ताव असून १ कोटी ३२ लाख ५० हजार रुपये, जुन्या विहिरींच्या १० लाभार्थ्यांना ५ लाख रुपये, ६ बोअरींगच्या १ लाख २० हजार, पंपाचे ४४ प्रस्ताव असून ८ लाख ८० हजार रुपये, विज जोडणी प्रस्ताव ४२ असून ४ लाख २० हजार रुपये, सोलर पंप ५ प्रस्तावांना १ लाख रुपये मंजूर आहेत.