रत्नागिरी:- जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून प्रथमच समाजकल्याण समितीची सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे झाली. सभापती परशुराम कदम यांची ही संकल्पना असून आंबडवे येथील समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
आंबडवे येथील पवित्र स्थळी देशभरातूनच नव्हे तर देशाबाहेरील सुद्धा अनेकजणं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांची होणारी गैरसोय तेथील ग्रामस्थांनी सभापती श्री. कदम यांच्यापुढे मांडली होती. ते प्रश्न समाजकल्याण समितीच्या बैठकीत मार्गी लावण्यात आले आहेत. बाबासाहेबांच्या विहारासमोर शेड उभारण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी 15 लाख रुपयांची गरज होती. त्याला तत्काळ मंजुरी देण्यात आली असून प्रशासकीय मान्यताही संबंधितांकडे तत्काळ सुपूर्द करण्यात आली. तसेच येथील पाणी योजनेसंदर्भातही चर्चा झाली. आरोग्य केंद्रातील समस्यांवरही तोडगा काढण्यात आला आहे. सभापती कदम यांच्या निर्णयाचे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व सभापती आणि सदस्यांनी कौतुक केले आहे. सदस्य संतोष थेराडे, महेश नाटेकर, विनोद झगडे यांनी सभापती कदम यांच्या अभिनंदनाचा ठराव केला.