रत्नागिरी:- मुर (ता. राजापूर) येथील कनिष्ठ महाविद्यालयात रस्त्यातून चालत जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला डुक्कराने धडक दिली. या धडकेत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. यश अनंत साळवी (वय १७, रा. मुर, ता. राजापूर) असे जखमी मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यश आणि त्याचा मित्र पार्थ पाष्टे असे दोघेजण सकाळी सरस्वती विद्यालय-पाचल येथे अकरावीचा प्रवेश झाला की नाही हे पाहण्यासाठी मुर गावातून जात असताना रस्त्याच्या जंगलमय भागात अचानक डुक्कराने यश साळवी याला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यश तेथेच कोसळला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली.