डिजिटल युगातही पत्रपेट्यांचे अस्तित्व अबाधित

रत्नागिरी:- वैयक्तिक पत्रव्यवहार संकल्पना लोप पावत चालली आहे. तरीही जिल्ह्यातील पत्रपेट्यांची संख्या तुलनेत फारच धीम्यागतीने कमी होत आहे. कंपन्या, शासकीय, निमशासकीय संस्थांसह इतर अनेक खासगी संस्थांचे पत्रव्यवहार होत असल्याने पत्रपेट्यांचे अस्तित्व अजून अबाधित आहे. गेल्या 10 वर्षात जिल्ह्यातील 449 पत्रपेट्या कमी करण्यात आल्या आहेत. मात्र  पोस्टांची संख्या वाढत आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा डोंगरदर्‍यांचा आणि वाडीवस्त्यांचा आहे. पूर्वी दळणवळण व्यवस्था मर्यादित होती. भ्रमणध्वनी, समाज माध्यमांसारखी प्रगत माहिती तंत्रज्ञान वापरात आले नव्हते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रमुख व्यक्ती नोकरीधंद्यानिमित्त जिल्ह्याबाहेर होत्या. अपुर्‍या दळणवळण व्यवस्थेमुळे अशा व्यक्तींचा गावातील कुटुंबाशी थेट संपर्क सणासुदीच्या दिवशीच असायचा. अशावेळी खुशालीसाठी पत्र हेच मुख्य साधन होते. त्यामुळे प्रत्येक वाडीवर, ग्रामपंचायतींच्या ठिकाणी, बाजार भरतो तेथे, बसस्थानक, बसस्टॉप अशा गर्दीच्या ठिकाणी पत्रपेट्यांची सुविधा करण्यात आली होती.

प्रगत तंत्रज्ञानामुळे आता गावागावातील वैयक्तिक पत्रव्यवहार कमी झाला आहे. आता थेट संभाषण होत असल्याने पत्रपेट्या कमी कराव्या लागत आहेत. ग्रामीण भागातील अनावश्यक पत्रपेट्या कमी होत असल्या तरी शहरात पत्रपेट्यांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात नवीन वसाहती, आस्थापना, उद्योगधंदे वाढू लागले आहेत. यासह शासकीय संस्थांचे पत्रव्यवहार पोस्टाद्वारे होत असल्याने शहरात पत्रपेट्या वाढवण्यात येत असल्याचे डाक विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात सन 2009-10 मध्ये 2227 पत्रपेट्या होत्या. सन 2020-21 मध्ये ही संख्या 1778 वर आली आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यात 10 वर्षांपूर्वी 139 पत्रपेट्या होत्या. त्या आता 77 वर आल्या आहेत. दापोलीत 258 होत्या त्या पत्रपेट्या 174 झाल्या आहेत. खेडमध्ये 258 पत्रपेट्या होत्या, त्या आता 179 झाल्या आहेत. चिपळुणात 10 वर्षांपूर्वी 293 असलेल्या पत्रपेट्या 292 वर पोहोचल्या आहेत. गुहागरात 136 पत्रपेट्या होत्या, त्या 114 आणि रत्नागिरीत 372 पत्रपेट्या होत्या त्या 167 वर आल्या आहेत. संगमेश्वरात 259 पत्रपेट्या 236 वर, लांजातील 182 पत्रपेट्या 178 झाल्या आहेत. तर राजापूर तालुक्यातील 330 पत्रपेट्या होत्या त्या आता 361 राहिल्या आहेत.

पत्रपेट्यांची संख्या कमी होत असली तरी पोस्टांची संख्या वाढती आहे. 10 वर्षांपूर्वी 656 पोस्टांची संख्या होती. ती आता 663 वर पोहोचली आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार या पोस्टांमध्ये सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे पोस्टांची सुविधा असलेल्या गावांची संख्याही गेल्या 10 वर्षात वाढली आहे. त्यानुसार 653 पोस्टांची सुविधा असलेल्या पोस्टांची संख्या 655 वर गेली आहे.