डंपर-दुचाकीच्या अपघातात स्वाराचा मृत्यू; अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा रस्त्यावर डंपरने मागून दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात संशयित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची ही घटना शनिवारी (ता. २८) सकाळी साडेनऊच्या सुमारास हातखंबा नागपूर पेठे रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी दर्शन महेश बाईग (वय २४, रा. हातखंबा गुरववाडी, रत्नागिरी) हे शनिवारी सोबत शुभम मारुती नागले असे दुचाकी (क्र. एमएच-०८ एजे ४०९२) वरुन सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एमआयडीसी रत्नागिरी येथे जाण्यासाठी निघाले होते. ते हातखंबा-नागपूरपेठे येथे आले असता त्यांच्या मागून येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या डंपर चालकाने मागून धडक दिली. यामध्ये त्यांच्या बसलेले शुभम नागले खाली पडले ते उठले व मागून येणाऱी दुचाकी थांबवून डंपरचा पाठलाग करत असताना दुचाकी (क्र. एमएच-०८ ए एल ०६७०) ला डंपने जोरदार धडक देऊन निघून गेला. या अपघातामध्ये दुचाकीवरिल स्वार मंगेश मधूकर भस्मे (रा. पाली, जि. रत्नागिरी) गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. तर दर्शन बाईग हे जखमी झाले. या प्रकरणी दर्शन बाईंग यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.