खेड:- महामार्गावरील खोपीफाटा येथे रत्नागिरीहून खेडकडे जाणाऱ्या दुचाकीला डंपरची धडक बसल्याने दुचाकी स्वारावर डंपरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अरुण जैस्वाल(वय-३०, शिवाजी नगर, नाचणे रोड रत्नागिरी) असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे. तर कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने तो रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन दोन महिलांना उडवले. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील एमआर म्हणून काम करणारा अरुण जैस्वाल दुचाकी (क्रमांक एम एच ०८ बीबी ५९०१) वरुन रत्नागिरी ते खेड असा निघाला होता. तो खोपीफाटा येथे रस्त्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी आला तेव्हा त्याचवेळी वेरळ खोपी मार्गावरुन येणारा डंपर (क्रमांक एम एच ०६ बीडी ०९८२) ने दुचाकीस जोरात धडक दिली. त्यानंतर दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि डंपर दुचाकी स्वाराच्या अंगावर चढवून पुढे गेला. या अपघातात दुचाकीस्वार बराचवेळ डंपरखाली अडकून मृत्यूमुखी पडला. स्थानिक मदतकर्त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, डंपर खाली अडकलेली व्यक्ती मृत पावला होता. त्यानंतर याच ठिकाणी गोवा एक्स्प्रेस कंपनीचा कंटेनर (क्रमांक जीएच ०५ टी ६३४८) चे ब्रेक निकामी झाल्याने विरुद्ध दिशेला जाऊन दोन महिलांना धडकला. या दोन्ही महिला रस्त्याच्या कडेला एसटीची वाट बघत उभ्या होत्या. दोघी हेदली गावच्या रहिवाशी आहेत, असे समजते. जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.