डंपरचे चाक पोटावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू

चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावर खेर्डी येथे आज बुधवारी दुपारी 3.30 वाजता डंपरने एका दुचाकीस्वार महिलेला चेंडूसारखे उडवले. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. समीना नासिम चिपळूणकर (28, खेर्डी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर तिचे वडील आदम चौगुले हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. अपघातानंतर या ठिकाणी गर्दी झाली होती.

प्राप्त माहितीनुसार, समीना नासिम चिपळूणकर या आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून प्रवास करत होत्या. खेर्डी बाजारपेठजवळ असलेल्या एका कॉम्प्लेक्ससमोर त्यांच्या दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत समिना डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांच्या पोटावरून चाक गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील आदम चौगुले हे जखमी झाले.
अपघातानंतर डंपर चालक तेथून फरार झाला. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे.

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.