डंपरची एसटीला धडक; डंपर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर तरवळ माचिवलेवाडी घोडखिंड या ठिकाणी डंपरने एसटी बसला धडक दिली. या अपघात प्रकरणी संशयित डंपर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद शोभनाथ यादव (वय ४० रा. बिसबरी पोस्ट-पतरही, ता. किराकत, जि. जोनपुर, राज्य उत्तरप्रदेश) असे संशयित डंपर चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २४) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास तरवळ-माचिवलेवाडी, घोडखिंड येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनोद यादव हे डम्पर (क्र. एमएच-०४ एफयु १७९७) घेऊन निवळी ते जयगड असे जात असताना डंपर निष्काळजीपणे चालवून डाव्या बाजूल उभ्या असलेल्या पिकअप टेम्पो (क्र. एमएच-०८ डब्ल्यू ४८९९) ला बाजू देऊन जात असताना समोरुन येणारी एसटी (क्र. एमएच-२० बीएल १२५०) धडक देवून अपघात केला. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.