ठेकेदाराचे लाड मुंबई- गोवा महामार्ग रखडण्याला मुख्य कारण: खासदार राऊत

रत्नागिरी:- संसदीय आयुदे वापरून केंद्र शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा १०० टक्के प्रयत्न केला. लोकसभेत एकूण ४६९ प्रश्न विचारले. लोकसभेमध्ये वेगवेगळ्या चर्चेत १०८ वेळा सहभागी झालो. लांजा तालुक्यातील माचाळच्या रस्त्याचा प्रश्न सोडविला. प्रत्येक मिनिट मतदारांसाठी जगलो याचे खासदार समाधान आणि अभिमान आहे. देशातील ऱखडलेल्या महामार्गामध्ये पहिल्या क्रमांकाचा मार्ग मुंबई-गोवा महामार्ग आहे. नितीन गडकरी यांनी प्रयत्न करूनही तो मार्गी लागला नाही, ही एक दुःख देणारी गोष्ट आहे, अशी भावना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदे लोखाजोखा २०१९ ते २०२४ या त्यांच्या कार्यहवालाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगरविकास मंत्री रवींद्र माने, महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, आपचे पदाधिकारी ज्योतीप्रभा पाटील, आमदार राजन साळवी, राजेंद्र महाडिक, सुभाष बने, बारक्यशेठ बने, मिलिंद कीर, आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, लोकसभेच्या कार्यकाळात गेली पाचही वर्षे प्रत्येक मिनिट मतदारांसाठी जगलो आणि मतदारसंघात विकास होण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्याचाच निवडक लेखाजोखा आपल्यासमोर सादर केला. मतदारांसमोर माझी कामगिरी सादर करताना ताठ मानेने, त्यांना अभिमान वाटेल असा लेखाजोखा मांडतो आहे. कोविडच्या महाभयंकर लाटेत दोन वर्षे संसदेचे कामकाज फारसे झाले नाही तरी उरलेल्या कार्यकाळात सरासरी उपस्थिती ७३% इतकी राहिली, २०२२ च्या पावसाळी अधिवेशनात कोरोनाची लागण झाल्यामुळे एकही दिवस उपस्थित राहता आले नव्हते, तर नवीन संसद भावनांच्या उद्घाटनासाठी ऐन गणपतीत चार दिवस अधिवेशन आयोजित केल्याने त्यावेळीही जाता आले नाही. हे वगळता सातत्याने पाच वर्षात कामकाजामध्ये पूर्ण वेळ सहभागी झालो, असे त्यांनी सांगितले.

सतराव्या लोकसभेत एकूण ४६९ प्रश्न विचारले. देशभरातील खासदारांची सरासरी २१० प्रश्न इतकीच आहे. लोकसभेमध्ये वेगवेगळ्या चर्चेत १०८ वेळा सहभागी झालो. देशभरातील खासदारांची चर्चेमध्ये सहभागी होण्याची सरासरी ४६.७ इतकीच आहे. लोकसभेत दोन अशासकीय विधेयकही मांडली. त्याचप्रमाणे ७८ रुग्णांना पंतप्रधान मदत निधीतून भरीव वैद्यकीय मदत मिळवून दिली.
लोकसभेच्या वेगवेगळ्या स्थायी आणि सल्लागार समित्यांवर काम केले, जनरल पर्पज कमिटी, इस्टिमेट
कमिटी, बिझनेस अॅडव्हायझरी कमिटी, अॅग्रीकल्चर ऍनिमल हजबंडरी अँड फूड प्रोसेसिंग कमिटी आणि हवाई नागरी वाहतूक मंत्रालयाची कमिटी यावर सदस्य म्हणून काम केले. स्थानिक मतदार संघ विकास निधीचा म्हणजेच खासदार निधीचा विनयोग शंभर टक्के केला.