लांजा:- रत्नागिरीतील लांजा नगरपंचायतीमध्ये ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधातला अविश्वास ठराव शिंदे गटाने 13 विरुद्ध शून्य असा जिंकत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. अविश्वास ठराव मंजूर होताच ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 10 एप्रिल रोजी मांडलेल्या या ठरावावर आज (17 एप्रिल) मतदान घेण्यात आले.
नगराध्यक्षांसह शहर विकास आघाडीतील 13 नगरसेवकांना गटनेता म्हणून पूर्वा मुळ्ये यांनी व्हिप बजावला होता. दरम्यान या अविश्वास ठरावावेळी शिंदे गटाचे पाच, काँग्रेसचे दोन, अपक्ष दोन आणि भाजपचे तीन नगरसेवकांसह नगराध्यक्षांनी मतदान केले. त्यामुळे हा अविश्वास दर्शक ठराव 13 विरुद्ध 0 मतांनी मंजूर झाला झाला.
लांजा नगरपंचायतीमध्ये आज उपनगराध्यक्ष पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याच्या आधी शिंदे गटासह 12 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले होते. अविश्वास ठरावादरम्यान होणारी संभाव्य पळवापळवी, फाटाफूट या गोष्टी टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली होती.
दरम्यान, पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधात मंजूर झालेला अविश्वास ठराव हा स्थानिक आमदार राजन साळवी यांना देखील धक्का मानला जात आहे. शिवाय, आगामी काळात स्थानिक पातळीवरील गणितं देखील बदलू शकतात. याचे पडसाद नगरपंचायतीच्या राजकारणात दिसू शकतात. सध्या या ठिकाणी राजन साळवी आमदार आहेत. शिवाय, विनायक राऊत खासदार आहेत. आमदार म्हणून राजन साळवी यांनी पकड मजबूत मानली जाते. त्यामुळे अविश्वास ठराव ठाकरे गटाच्या विरोधात जाणं हा राजन साळवी यांना धक्का आहे.
या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरची फोडाफोडी आणि कटशाहचे राजकारण पाहायला मिळालं. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी येथील सभेत ठाकरे गटाच्या लांजा नगरपंचायतीतील नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. याकामी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किंग मेकर म्हणून ओळख असलेल्या किरण सामंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नगरसेवकांच्या साथीने शिंदे गटाने ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे.