ट्रकची एसटीला धडक; ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड ते खंडाळा रस्त्यावर जयगड बौद्धवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ ट्रकने एसटीला धडक दिली. दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या ट्रक चालकाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैनुलअबीदिन कचली (मुळ रा. मक्का मजीद सोसायटी, मोरकंडा रोड, जामनगर गुजरात. सध्या रा. हाती दाऊद आईस ॲण्ड कोल्ड स्टोअरेज, संदखोल फाटा, रत्नागिरी) असे संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १४) सकाळी आठच्या सुमारास जयगड बौद्धवाडी रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने निष्काळजीपणे ट्रक (क्र. एमएच – ०८ एपी ५६१३) चालवून जयगड ते खंडाळा जाणाऱ्या एसटी (क्र. एमएच २० बीएल १७१२) हिला चालक साईडच्या मागील बाजूस धडक दिली. या अपघातात एसटी व ट्रकचे नुकसान झाले. या प्रकरणी संतोष सुधाकर घोसाळे (रा. वाटद खंडाळा, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.