टेम्पोला दुचाकीची धडक; अपघातात दोघे गंभीर जखमी

रत्नागिरी:- जाकादेवी ते संगमेश्वर जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी चालवत असताना समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक देत अपघात केला. ही घटना गुरुवार १३ जुलै रोजी दुपारी १ वा. घडली आहे. या अपघातात ओमकार इराप्पा पाटील (१७), प्रशांत पाटील (१७) दोन्ही (रा. दातेवाडी खेर्डी चिपळूण) हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे दोघेही गुरुवारी खेड येथून दुचाकीवरून गणपतीपुळे येथे जात होते. संगमेश्वर जाणाऱ्या रस्त्यावरील मेढे फाटा येथे आले असता दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांनी समोरुन येणाऱ्या टेम्पोला धडक देत अपघात केला. यात प्रशांतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोघांनाही जिल्हा शासकीय रुणालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत तेथील पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.