रत्नागिरी:- लांबलेल्या पावसामुळे यंदा पाणी टंचाईचे स्वरुप तीव्र नसेल असा अंदाज वर्तविला आहे; मात्र कोरोनामुळे अनेक पाणी योजनांना निधी नसल्यामुळे त्यांची कामे रखडलेली आहे. टंचाई कालावधीत पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी टंचाई आराखड्यात नळ योजना दुुरुस्तीबरोबरच नविन विंधन विहीरींना मागणी वाढली आहे. यंदा 280 विहीरींची मागणी असून त्यासाठी 1 कोटी 96 लाख रुपयांची तरतूद केली आहे.
टँकर पोचणे शक्य नाही अशा ठिकाणी विंधन विहिरींचा प्रस्ताव मान्य करून तिथे पाणी पुरवठा करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जातो. गावागावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पेयजलसह विविध योजना आखल्या जातात. कोरोनातील परिस्थितीमुळे गतवर्षी अनेक योजनांचा निधी अजुनही प्राप्त झालेला नाही. त्या योजना अपूर्णावस्थेत आहेत. गतवर्षीचा पाणीटंचाईचा 8 कोटी रुपयांचा निधी अडकून पडलेला आहे. नळ योजना अपूर्ण असल्याने उन्हाळ्यात टंचाईची तिव्रता वाढणार हे नक्की आहे. त्याला पर्याय म्हणून टँकर ऐवजी विंधन विहीरींचा पर्याय निवडला जात आहे. गतवर्षीपेक्षा यंदा विंधन विहिरींची संख्या वाढलेली आहे. सर्वसाधारपणे दीडशे ते पावणेदोनशे विहिरींची मागणी असते. यंदा नळ योजना दुरुस्तींसह विहिरींचे प्रस्ताव अधिक आलेले आहेत. सर्वाधिक मागणी दापोली तालुक्यातून आहे. त्यापाठोपा सर्वाधिक टंचाईग्रस्त तालुके असलेल्या खेड, संगमेश्वर तालुक्यातून प्रस्ताव आले आहेत.