गुहागर:- तालुक्यातील बहुचर्चित झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल अनंत लांजेकर यांच्यावर विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव रद्द करण्यात आला आहे. एकूण ४ सदस्यांनी त्यांच्या बाजूने कौल दिला. यामुळे विरोधकांनी सरपंच लांजेकर यांच्यावर केलेल्या आरोपांना मूठमाती मिळाल्याचे समोर आले आहे.
झोंबडी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन काही विरोधकांनी सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव गुहागर तहसील कार्यालयाकडे ३० सप्टेंबर रोजी सादर केला होता. त्यानुसार सोमवारी तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.
यावेळी तहसीलदारांनी प्रथम सरपंचावर अविश्वास ठरावाच्या प्रस्तावातील विषयावर चर्चा सुरू केली. सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या रुकसार हुसैन ममतुले या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र झाल्याची नोंद घेण्यात आली. त्यानंतर अर्जातील विषय क्र. १, २, ३ वर सदस्यांचे मत विचारण्यात आले. त्यावेळी उपस्थित सदस्यांनी सरपंचांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, सदरचा अर्ज आम्ही स्वतः लिहिलेला नाही. काही ग्रामस्थांनी या अर्जावर आमच्याकडून सह्या करून घेतल्या आहेत, असे स्पष्ट करताना सरपंचांनी कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी सूचक म्हणून मयुरी महेश लांजेकर, तर अनुमोदक म्हणून प्रणाली प्रदीप पवार यांनी भूमिका बजावली. यावेळी सरपंचांच्या बाजूने प्रणाली प्रदीप पवार, मयुरी महेश लांजेकर, जैनब अब्दुलवहिद ममतुले, अतुल अनंत लांजेकर यांनी मतदान केले. यापुढे अतुल लांजेकर हेच पुन्हा झोंबडी सरपंच म्हणून कार्यरत राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले.