झेंडावंदनला जलसंधारणच्या कार्यकारी अभियंत्यांची दांडी

पालकमंत्री, कोकण आयुक्तांकडे जिल्हाधिकारी करणार तक्रार

रत्नागिरी:- पंतप्रधानांपासून अगदी स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना झेंडा फडकवण्याचे आवाहन केले जात असताना, रत्नागिरी पाटबंधारे कार्यालयात मात्र आपल्या कामकाजाने चर्चेत असणारे मृद व जलसंधारच्या कार्यकारी अभियंत्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यालयातील झेंडा वंदनला दांडी मारल्याने एकच चर्चेचा विषय ठरले आहेत.

हर घर तिरंगा अभियान केंद्र व राज्य शासनाकडून राबवून देशभक्ती प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात जागवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यासाठी विविध उपक्रमही ग्रामपातळीपासून देशपातळीपर्यंत राबवण्यात आले. प्रत्येक शासकीय कार्यालयाकडून यामध्ये भाग घेऊन कार्यक्रम करण्यात आले. शासकीय इमारतींनाही विद्युत रोषणाई करण्यात आली.

शेती व माणसांची तहान भागवणार्‍या पाटबंधारे विभागानेही आपल्या कार्यालयाबरोबरच विविध प्रकल्पांवरही आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. काही लघु पाटबंधारे प्रकल्पांवरील व पाण्यावरील रोषणाई आकर्षणाचा विषय ठरली होती.
परंतु हे उपक्रम राबवत असताना काही अधिकारी मात्र या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवापासून लांब राहिल्याचे दिसून आले. पाटबंधारे विभागातील मृद व जलसंधारणचे कार्यकारी अभियंता सुहास गायकवाड यांनी स्वातंत्र्यदिना दिवशी मुख्यालयातील झेंडा वंदनकडे पाठ फिरवल्याने, त्याची कुजबूज कर्मचार्‍यांमध्ये अधिक रंगली होती. अभियंता गायकवाड यांच्या कार्यालयीन कामाबाबतही अनेक तक्रारी वरिष्ठ व जिल्हाधिकार्‍यांकडे आलेल्या असल्याची चर्चा आहे. झेंडावंदनला अनुपस्थित राहिल्याबाबत जिल्हाधिकार्‍यांपर्यंत काही नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या आहेत.

मुख्यालयात झेंडावंदनला अनुपस्थित राहणे अत्यंत मोठी चूक आहे. मुळात कार्यकारी अभियंता गायकवाड यांच्यामुळे चुकीच्या कामाकाजाच्या पध्दतीने जलसंधारणमधील कामात जिल्हा मागे गेला आहे. त्यांच्याविषयी आपण पालकमंत्री व कोकण आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत.
एम. देवेंदर सिंह,
जिल्हाधिकारी रत्नागिरी