झाली भैरी-शिवाची भेट हो… राजिवड्यात रंगला पालखी भेट सोहळा

रत्नागिरी:- काय वर्णू ती मी शोभा, आजच्या दिनाची, भेट झाली पहा ओ भैरी शिवाची… अशा अभंगाच्या तालावर राजिवडा येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भेरीबुवाच्या पालखी भेटीचा सोहळा श्रावणाच्या दुसर्‍या सोमवारी रंगला. ही पालखी भेट पाहण्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित होते.
श्रावण महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी श्रीदेव काशीविश्वेश्वर आणि मांडवी येथील श्रीदेव भैरी या दोन भावांच्या भेटीचा सोहळा रंगतो. यासाठी श्रीदेव भैरीची पालखी दरवर्षी राजिवडा येथे श्री काशीविश्वेश्वराच्या भेटीसाठी येत असते.
श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दोन्ही मंदिरांमध्ये नामसप्ताहाला प्रारंभ होतो. दुसर्‍या सोमवारी नामसप्ताहाची सांगता होते. यावेळी दोन्ही देवतांची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. यावेळी अभंग गात भक्तगण तल्लीन होऊन यात सहभागी होत असतात. श्रीदेव काशीविश्वेश्वराची पालखी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा करते. या प्रदक्षिणेदरम्यान, तिसर्‍या प्रदक्षिणेला श्रीदेव भैरी देवाच्या पालखी भेटीचा सोहळा रंगतो. यावेळी अब्दागीर, वीणा यांचीही भेट सुरुवातीला रंगते. पालखी भेटीवेळी भक्तगणांच्या उत्साहाला महापूर आल्याचा भास होतो.

मांडवी येथील श्रीदेव भैरीची पालखी राजिवड्यात येताना, विठ्ठल मंदिर, तेलीआळी नाका, खडपेवठार मार्गे राजिवडा धारेवर येते व तेथील भेटीसाठी मंदिराच्या दिशेने खाली येते. दरवर्षी रंगणारा हा अनोख्या सोहळ्याने हजारो भक्तगणांच्या डोळ्याचे पारणे फेडले.