रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे कार झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जण जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
सुरवील रघुनाथ पुरळकर (२३) व सुरभी रघुनाथ पुरळकर (वय ४९, दोन्ही रा. पुरळ ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरवील हा कार (क्र. एमएच-४८ सीसी ५८८५) घेऊन पनवेल ते देवगड असा जात होता. यावेळी कारमध्ये सुरभी पुरळकर यांच्यासह अन्य नातेवाईक देखील प्रवास करत होते. रविवारी रात्री चालकाचा कार वरील ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात सुरवील व सुरभी पुरळकर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.