वक्फ कार्यालयाच्या नुतनीकरण प्रसंगी ना. सामंतांचा सवाल
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अंतर्गत जिल्हा वक्फ कार्यालयाच्या नुतनीकरणाचा शुभारंभ आज होत आहे. कार्यालयाची स्थापना सहा महिन्यांपूर्वीच झाली आहे. काहींचा गैरसमज झाला आहे. परंतु आपण सर्व समाजाला समान न्याय देतो. परंतु लोकसभा निवडणुकीत तुम्ही ज्यांना मते दिलीत ते उबाठावाले आता गेले कुठे? कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांच्या समोर उबाठा पदाधिकाऱ्यांनी उभे राहणे आवश्यक होते असा टोला पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला.
जिल्हा वक्फ कार्यालयाच्या नुतनीकरणाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शिरगावचे माजी सरपंच रज्जाकशेठ काझी, उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी नगरसेवक सोहेल साखरकर, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, माजी नगरसेवक मुसा काझी , शकील मजगावकर, अकबर आंबेडकर यांच्यासह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो. आम्ही मंदिरात जातो त्याप्रमाणे आपण मशिदीत जाता. प्रत्येकाच्या मनात देव असतोच. परंतु आज याचे राजकारण केले जातेय. काँग्रेस, उबाठाकडून अपप्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घटना बदलणार असा अपप्रचार करून लोकसभा निवडणुकीत मते मिळविण्यात विरोधक यशस्वी झाले. मुस्लीम समाजानेही त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले. परंतु आज मुस्लीम समाजालाही जागे होण्याची वेळ आली आहे. आज संकटाच्या काळात उबाठा, काँग्रेसवाले नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिलेदार तुमच्यासोबत आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोणासोबत रहायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे. असे सांगत वक्फ बोर्डाच्या माध्यमातून तुम्हाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचे ना.सामंत यांनी स्पष्ट केले.