ज्यांना खोके माहीत तेच खोक्यांची भाषा करतात

मुख्यमंत्री शिंदे ; रत्नागिरीत सभेला विक्रमी प्रतिसाद

रत्नागिरी:- खोके सरकार, खोके घेतले अशी टीका आमच्यावर केली जाते. पण ज्यांना खोके माहीत तेच खोक्यांची भाषा करु शकतात. आम्ही खोके घेणारे नाही तर देणारे आहोत. रत्नागिरीकरांना विकासासाठी पन्नास नाही, तर 750 कोटी दिले आहेत, अशा शब्दात विरोधकांच्या टीकेचा समाचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत ठाकरे सेनेवर तोफ डागली.

शहरातील कै. प्रमोद महाजन क्रीडांगणावर आयोजित बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची भव्य सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरीकरांतर्फे सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विकास कामांच्या उद्घाटनासाठी आयोजिक ऐतिहासिक सोहळयाला आलो असता शहरातील सगळ्या रस्त्यावर गर्दी दिसत होती. एवढ्या संख्येने इथे आलेले लोकं म्हणजे आमच्या कामाची पोचपावतीच आहे. हे प्रेम पाहिल्यानंतर आपण घेतलेला निर्णय योग्य आहे, याचं समाधान मिळत आहे. निसर्गरम्य कोकणात आल्यावर बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोकणी माणसाने बाळासाहेबांना भरभरुन प्रेम दिले. त्यांचे कोकणाशी वेगळं नाते आणि समीकरण होते. बाळासाहेबांचे हिदुत्ववादी विचार कोकणच्या मातीत रुजले आहेत. ते कधीही पुसले जाणार नाहीत. तसं करण्याचा प्रयत्न कुणी केला, तर कोकणी माणूस त्याच्या डोक्यात कोकणातील नारळ फोडल्याशिवाय राहणार नाही. कोकणी माणूस प्रेमळ आहे, आंब्यासारखा गोड आहे. फणसारखा बाहेरून काटेरी असला तरीही आतून तेवढाच गोड आहे. तो अपप्रवृत्तीला थारा देत नाही. आम्हीही बाळासाहेबांची भुमिका पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.आम्ही लोकांच्या मनातील, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार दिले आहे. सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पण आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ.

बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंची शिकवण घेऊन आम्ही विकास करत आहोत. गेल्या तिन-चार महिन्यात घेतलेले निर्णय हे विरोधकांची चिंता वाढविणारा आहे. त्यामुळे त्यांच्या छातीत धडकी भरली असून पायाखालची वाळू सरकली आहे. बाळासाहेबांची भुमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी तडजोड करणार नाही. मिंधे गट नाही तर आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत.

या सभेला पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार योगेश कदम, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार सदानंद चव्हाण, उद्योजक किरण सामंत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

पडद्यामागून सरकारला बदनाम करण्यासाठी सीमावाद

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर ते म्हणाले, दिल्लीत सीमावादावर प्रथमच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील नागरिकाला त्रास होता कामा नये अशा सुचना केल्या आहेत. तिन मंत्र्यांची समिती स्थापन केली असून आयपीएस अधिकार्‍यांची समिती लवकरच केली जाईल. हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाही त्यावर टीका होते. या वादातून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न पडद्यामागून सुरु आहे.

उदय सामंतांचे कौतुक

मंत्रीपद मिळाल्यानंतर उदय सामंत हे उदयोगवाढीसाठी धावपळ करत आहेत. लवकरच स्विझर्लंडला जाऊन हजारो कोटीचे करार ते करणार आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी आम्ही काम करत आहोत. रत्नागिरीकरांना न्याय देणारा, आपल्या मतदारांना कुटुंबाप्रमाणे सांभाळणारा आमदार मिळाला आहे,अशा शब्दात सामंत यांचे कौतूक करत,तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यानी दिली.