रत्नागिरी:- समुद्रातील जोरदार वाऱ्यामुळे उसळलेल्या लाटांच्या तडाख्यामुळे रत्नागिरी समुद्रात एक मच्छीमार नौका उलटली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नौकेचे मात्र नुकसान झाले. रत्नागिरी समुद्रात १२ नौटीकल मैल अंतराबाहेर बाळा मेस्त्री यांच्या मालकीची नौका रविवारी संध्याकाळच्या वेळी मासेमारी करत होती.
समुद्रात जोरदार वारे सुटले आहेत. या वाऱ्यामुळे उसळलेल्या लाटांच्या तडाख्याने मच्छीमार नौका उलटली. आजुबाजूला मासेमारी करणाऱ्या इतर नौकांनी खलाशी आणि तांडेलना सुखरुप किनाऱ्यावर आणले. रविवारी सायंकाळी उशीरापर्यंत उलटलेली बोट सरळ करुन बंदरावर आणण्याचे प्रयत्न सुरु होते. नौका किनाऱ्यावर आली नसल्याने मत्स्यव्यवसाय विभागाकडे नुकसानीची माहिती उपलब्ध झाली नाही.
जिल्ह्याला १६७ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. सुमारे २५२० मच्छीमार नौका या समुद्रात मासेमारी करतात. गेल्या काही महिन्यांपासून यातील बहुसंख्य नौकांना मासळीचा रिपोर्ट मिळालेला नाही. खर्चाइतकीही मासळी मिळालेली नाही. सुमारे ४६ कोटी रुपयांचे डिझेल परताव्याचे अनुदान मिळाल्याने काही मच्छीमार नौका मालकांचे नुकसान डोक्यावरुन खांद्यावर आले. आता तर समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने आणि चांदण्यामुळे मासळी मिळत नसल्याने बहुसंख्य नौका मिरकरवाडा बंदरात उभ्या आहेत.









